...असा उपवास केल्याने देव भेटतो !!

उपवास केल्याने देव भेटतो !!

लहानपणी/शाळेत असतांना पेटुराम ची गोष्ट आपण सगळ्यांनीच ऐकली असेल. “आज मेरा उपवास है मै अधिक नाही खाता ” उपवासाच्याच दिवशी जास्त खाणाऱ्या पेटुराम ची गोष्ट आपल्याला खूप मजेदार वाटायची. पण कधी विचारही केला नसेल कि, कितीतरी पेटुराम आज आपल्यामध्ये देखील आहेत. ज्यांच्यामुळे आपली उपवासाची व्याख्याच बदलली आहे.

वर्षानुवर्षांपासून चालत आलेला उपवासाचा वारसा आजही समाजात जिवंत दिसतो. किंबहुना उपवास हा देव प्रसन्नकरण्याचं एक साधन म्हणूनही गणला जातो. समाजाच्या अनेक भागांमध्ये “उपवास केल्याने देव भेटतो, किंवा अनिष्ट कार्य टळते” अशी श्रद्धा स्थित आहे. बऱ्याच लोकांच उपवासाच कारण हे इतर काहीही नसून आपल्यासोबत काही अनिष्ट घडू नये हेच असतं. आज आपल्याला त्याच्याच बद्दल जाणून घ्यायचं आहे. वास्तविकरीत्या बघितले तर उपवास हा प्रत्येकासाठीच गरजेचा आहे. म्हणून आपल्याकडे श्रावण महिना, गणपती व नवरात्र, १६-सोमवार, २४-एकादशी, २४-चतुर्थी, आठवड्याचे सोमवार-गुरुवार-शनिवार असे सर्व छोटे-मोठे दिवस मिळून वर्षाच्या एक तृतीयांश भागातील दिवस हे उपवासाचेच असतात.


वैज्ञानिक दृष्ट्या बोलायचं झालं तर शरीराच्या स्वास्थ्यासाठी, उपवास आवश्यक आहे. पचन संस्थेला (Digestive Systemआराम मिळतो व ती अधिक वेगात काम करते. उपवासाच्या दिवसाचा आहार देखील तसाच आहे. बरीच लोक या दिवशी लिंबू-पाणी पितात. लिंबू-पाणी पिल्याने प्रतिकारशक्ती वाढते, किडनी व आतड्यांची सफाई होते, त्यामुळे पोट साफ होऊन अनेक गुप्तरोग नष्ट होतात. तसेच उपवासाच्या दिवशी बऱ्याच लोकांना दुग्धजन्य पदार्थ आवडतात जसे की दही- दह्याने शरीर आत्म्याची शुद्धी होऊन बुद्धीची स्मरण शक्ती वाढते, चरबी कमी होते. एखाद्या देवाच्या नावाने उपवास केल्यास तो देव आपल्यावर खुश होईल असा विचार येऊन मन देखील खुश होते. 

आवश्यकतेनुसार उपवासाचे स्वरूप बदलते. उदा. शारीरिक श्रम करणाऱ्या, मेहनतीने मजुरी करणाऱ्या किंवा शारीरिक अभ्यास करणारे उदा. खेळाडू इ. लोकांनी महिन्यातून एकदा उपवास केला तरी खूप झालं. यातूनच आपल्याकडे विविध प्रकार आले. चतुर्थीचा एक दिवस, एकादशीचा दीड दिवस, रामनवमीचा अर्धा दिवस, गणेशोत्सवात दहा दिवस इ. शरीराच्या स्थितीनुसार प्रात:कालीन, सायंकालीन, एकदिवसीय असे प्रकार पडतात.

आजच्या आधुनिक विज्ञानाने देखील मानले आहे कि कॅन्सर सारख्या मोठमोठ्या रोगांवर उपवास फायदेशीर आहे. कारण कॅन्सर सेल्स ला अधिक प्रमाणात अन्नाची गरज असते. आणी जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा त्यांना योग्य प्रमाणात आहार न भेटल्यास त्या मरायला लागतात आणी थोडा देखील परिणाम आपल्या स्वस्थ पेशींवर होत नाही.

तसेच डोकेदुखी, पित्त (Asidity), जीवनसत्व, खनिज यांची कमी असे त्रास असेलेल्या लोकांनी उपवास करू नये. म्हणजे एकंदरित पाहता आपल्या स्वतःच्या सर्वांगीन विकासासाठी उपवासाची निर्मिती झाली मग उपवास जर आपल्यासाठी असेल तर उपवासाच्या दिवशी तांदळाची खिचडी काय व साबुदाण्याची खिचडी काय काहीही खाल्ले तरी काय बिघडते? कारण भारताच्या विविध भागांत उपवासाचे पदार्थ वेगवेगळे आहेत. आणि जर उपवास केल्यावर देव मिळतो हे सत्य असेल तर तांदूळ व साबुदाणा काहीही खाल्ले तरी देव भेटलाच पाहिजे कारण दोन्हीही गोष्टी देवाच्या कृपेशिवाय निर्माणच होऊ शकत नाही.

सांस्कृतीक दृष्ट्र्या विचार केला तर आठवड्याकाठी १५-दिवसांकाठी एक दिवस असा असावा की ज्या दिवशी दैनंदिन जीवनापेक्षा वेगळ जगावं. भाजी-भाकर, वरण-भात इ. या दैनंदिन व्यवहारातील आहाराच्या भोगात न पडता साधा आहार घ्यावा आणि जितका जास्त वेळ वाचेल तेवढा जास्त वाचवून तो वेळ संस्कृतीच्या, राष्ट्राच्या, देशाच्या कामासाठी वापरावा आणि तो दिवस म्हणजे उपवासाचा दिवस.

सर्वसाधारणपणे पाहिलं तर आज शरीरस्वास्थ्यासाठी कोणीही उपवास करतांना दिसत नाही. सगळे उपवास करतात कारण त्यांची अशी श्रद्धा असते कि "उपवास केला कि देव भेटतो, तसेच अनर्थ टळतो".  मुलाचं लग्न जमावं म्हणुन सिद्धीविनायकाला नवस त्यातुन चतुर्थीचा उपवास, शेतीत नुकसान होऊ नये म्हणून विठ्ठलाला साकडं-एकादशीचा उपवास, भुत-प्रेत यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी विविध शांतीचे उपवास, सात जन्म चांगला पती मिळावा म्हणून वटसावित्री च व्रत, इत्यादी प्रकारचे व्रत-उपवासांमध्येच समाज गुरफटलेला दिसतो. याचा अर्थ या सगळ्या गोष्टी करू नये असा नाही. पण वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवला तर ह्या गोष्टी अशक्यच आहेत. पण इतक्या वर्षांपासून समाजात रुजलेल्या ह्या गोष्टी विनाकारण नक्कीच नाहीयेत. त्यांच्यामागे काही ना काही शास्त्र नक्कीच आहे.


खरं पाहता उपवासाने शरीरस्वास्थ सुधारते ही गोष्ट side effect आहे. उपवास या शब्दातच त्याचा अर्थ आहे. "उप+वास", उप म्हणजे जवळ आणी वास म्हणजे राहणे. ज्याच्या नावाने उपवास करतो त्याच्या जवळ जाऊन राहण्याचा प्रयत्न करणे म्हणजे उपवास. उदा. जन्माष्टमीच्या दिवशी जर मी कृष्णाच्या नावाने उपवास करत असेल तर त्या दिवशी मला त्यांच्या जीवनाचा अभ्यास केला पाहिजे. ज्याप्रकारे ते जगले, मी देखील तसचं जगण्याचा प्रयत्न करायला हवा. आणि ते करण्यासाठी दररोजच्या कामा-धंद्याच्या व्यापामुळे वेळ मिळत नाही म्हणून तो उपवासाचा दिवस आला. कृष्णाच्या बासरीतून जसा मधुर आवाज येतो तसचं माझ्या तोंडातून देखील मधुर वाणीच बाहेर पडेल याची काळजी आपण घ्यायला हवी.
त्यांनी जसं सदैव अत्याचार, वाईट वृत्तीचा संहार/नाश करण्यासाठी कंस, नरकासुर यांचा वध केला तसेच आपण देखील आपल्या आजूबाजूला जर अशा गोष्टी होत असतील तर त्यांना त्वरित आळा घातला पाहिजे. जन्माष्टमीचा उपवास जर समजपुर्वक केला तर खऱ्या अर्थाने नरकचतुर्दशी साजरी होईल आणी समाजातून बलात्कारासारख्या अत्याचारांचा नाश झाल्याखेरीज राहणार नाही. अशाप्रकारे समजुन, विचार करून उपवास केला कि माझ्यासारखा सामान्य माणूस देखील कृष्णाच्या त्या पवित्र 'अहं ब्रम्हास्मि', श्रीभगवानुवाच च्या अवस्थेला पोहोचू शकतो. म्हणुनच तो सिद्धांत आला असावा कि- उपवास केला कि देव भेटतो. वास्तविक पाहता उपवास केल्यावर देव भेटतो असे नाही तर उपवास केल्यावर माणूस देवासारखा होतो असा सरळ सोपा उपवासाचा अर्थ आहे. पण Communication Gap मुळे या अर्थाचा अपभ्रंश होऊन उपवास केल्यावर देव भेटतो असाच अर्थ समाजात प्रचलित झाला. कारण आपल्या संतांनी देखील म्हंटले आहे कि साबुदाणा खाल्ल्यावर भेटायला- "देव काय बाजारातला भाजीपाला नाय"

खरंच समाजातल्या बऱ्याच लोकांना उपवास म्हणजे काय हे आजदेखील माहीत नाहीए. ते आजदेखील इडापीडा टळावी, काही अनर्थ होऊ नये, भुत-प्रेत इ. गोष्टींचा त्रास होऊ नये म्हणूनच उपवास करतात. आता आपल्याला तर उपवासाच्या अर्थ समजला आहे, आणि असं म्हणतात की ज्ञान दिल्याने वाढते. तोच अर्थ आपण इतरांना सांगूया, हा लेख इतरांपर्यंत share करूया जेणेकरुन उपवासाचा योग्य अर्थ समाजात रुजेल.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या