आषाढी एकादशी विशेष पांडुरंग पंढरी की मनमंदीरी ?

पांडुरंग पंढरी की मनमंदीरी ?

 उस्मानाबाद जिल्ह्यातील एका खेड्यातील ही गोष्ट. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीचा उत्सव जल्लोष आणि उत्साहात साजरा करून परतीच्या प्रवासाने सर्व संत मंडळी रस्त्यात लागणाऱ्या तेरढोकी या संत संत गोरा कुंभार यांच्या गावी जाण्याचे निश्चित करतात. संत नामदेवांसह इतर सर्व संत मंडळी संत गोरोबा काकांच्या घरी येऊन पोहोचतात. तिथे योग्य पाहुणचार होतो, मुक्काम होतो आणि असेच एक दिवस गप्पा मारत ओसरीवर सगळे बसलेले असतात. पुढील वर्षभरतील आयोजन नियोजनाच्या गप्पा सुरु असतात त्यातच लहान मुक्ताबाईला जवळच पडलेले धोपटणे नजरेस पडते. ती त्याला उचलून हातात घेते व गोरोबा काकांना विचारते. काका हे काय आहे? 

ते धोपटणे आहे पोरी. गोरोबा काका म्हणाले. हे कशासाठी वापरतात? मडक भाजल्या नंतर पक्क भाजलंय की नाही ते तपासण्यासाठी या धोपटण्याचा वापर होतो. गोरोबांनी सहज बोलुन टाकल. त्यावर मुक्ताबाई म्हणते, काका, इथेही खूप सारे मडके बसलेत त्यापैकी कोणतं कच्च व कोणत पक्क हे कस कळणार? चला ह्याही मडक्यांवर धोपटण्याने मारून बघूया. असं म्हणून मुक्ताबाईने बसलेल्या प्रत्येकाच्या डोक्यात एक-एक धोपटणे मारायला सुरुवात केली. कोणीही काहीही बोलले नाही, पण नामदेवांच्या डोक्यात धोपटणे बसताच ते ओरडले ‘काय वेडेपणा चालवलाय?’ तेवढ्यात मुक्ताबाई हसून ओरडू लागली- ‘मडकं कच्च रे कच्च’. नामदेवांना आणखी जास्त राग आला त्यांना हा स्वतःचा अपमान वाटला. ते तेथून निघाले व सरळ पंढरपुरात जाऊन पोहोचले त्या पोरीची तक्रार विठ्लाला करीन अशा विचाराने. गाभाऱ्यात पोहोचल्यावर नामदेव म्हणतात- देवा, ती एवढीशी चिमुरडी मला कच्च मडकं म्हणते रे..... तेव्हा विठ्ठल म्हणाला नामा तुझ मडक खरंच कच्च आहे रे, नामदेवांना आश्चर्य वाटलं. स्वतः पांडुरंग त्यांना कच्च मडक म्हणत होता. विठ्ठल म्हणाला नामा, त्या मुलीने तुला चिडवलं त्याची तक्रार करायला तु इतक्या लांब आलास. तुला रस्त्यात, तिथे, कुठेही मी नाही का रे दिसलो? मी कुठेच नव्हतो का? तेव्हा नामदेवांना स्वतःच्या चुकीची जाणीव झाली व आपलं मडकं कच्च कस आहे हे समजलं व त्याला पक्क भाजण्यासाठी भक्ती केली.


 आज आपल्या सर्वांचही काहीस तसच होतंय. इतर वेळी तर आपण सर्वजण विठ्ठलाला भेटायला पंढपूराला जातोच पण सध्याची परिस्थिती (covid-19 निर्बंध) पाहता सर्वांनाच आपली माऊली विठ्लाला भेटायला पंढरपूरला जाता येईल असे शक्य नाही. याचा अर्थ ह्याही वेळी आषाढीची वारी नाही, विठ्लाला भेटणे नाही, उत्सव नाही इ. सारे प्रश्न मनात उद्भवत असतील तर त्याने आपले मडके अजून कच्चे आहे असे समजून त्याला भाजून पक्के करण्यास सुरुवात करावी. नामदेवांप्रमाणे लगेच विठ्लाला तक्रार करू नये. इतर संतांप्रमाणे विवेकी बुद्धीने पाउल टाकावे.


 मागील वर्षी प्रमाणे या वर्षीची वारी देखील आपण घरीच साजरी करूया, कारण विठ्ठल हा फक्त पंढरपुरातच नाही तर प्रत्येकाच्या मनमंदिरात राहतो. पंढरपूर तर फक्त त्याच्या लाडक्या, कर्मयोगी भक्तांना एकत्र भेटण्याचे ठिकाण आहे. विठ्ठल मात्र त्या चार भिंतीत नसून प्रत्येक भक्ताच्या हृदयात विसावला आहे. म्हणून यावर्षी आपण विठ्ठलाच्या सर्वगुणसंपन्न, विवेकी, कर्तव्यनिष्ठ, निष्ठावान, भक्तांच्या मार्गावर आपले जीवन कसे चालेल याकडे लक्ष देऊ. त्यासाठी एकांताची गरज असते आणि तो यावर्षी परिस्थितीने आपल्याला दिला आहे. या वेळेचा फायदा घेऊन आपण आपलं मडकं भाजून अधिक पक्कं केलं तर नंतर वर्षानुवर्षांनंतरही ही जर कोणी धोपटणे मारून परीक्षा घेतली तरी आपण नापास होणार नाही.
 आपण सगळे मिळून ह्या वर्षी वारीच्या दिवशी विठ्ठलाच्या विचारात दंग होऊन आपापल्या घरीच राहून आपले मडके कच्चे आहे कि भाजले आहे ते तपासून त्यावर तयारी सुरु करूया.

|| राम कृष्ण हरी ||

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या